
महापालिकेतर्फे चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयात मद्यधुंद अवस्थेत राडा करत एका रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केली. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली अशी माहिती मार्डच्या डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात राज्य आरोग्य सेवा हिंसाचार प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका रुग्णाने मद्यधुंद अवस्थेत राडा घातला आणि एका महिला डॉक्टरला मारहाण केली. एक माणूस जखमी अवस्थेत लोकमान्य टिळक रुग्णालयात आला. त्याला गंभीर इजा झाली होती आणि त्याच्या जखमेला टाके घालावे लागणार होते. इतर डॉक्टरांनी त्याला आधीच टाके घातले होते आणि त्याच्या जखमेत अडकलेला कापूस डॉक्टर काढत होत्या, हे करावं लागतं कारण काय झालं आहे ते पाहण्यासाठी जखम मोकळी करावी लागते. त्यावेळी या रुग्णाला वेदना होऊ लागल्या ज्यानंतर त्याने डॉक्टरला ढकललं. या रुग्णाने मद्यपान केलं होतं अशी माहितीही समोर आली आहे. आम्ही याबाबत अधिक माहिती घेत आहोत असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मार्डचे सदस्य असलेले डॉक्टर अक्षय मोरे यांनी यासंदर्भांतील पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, रुग्ण हा त्याच्या सात ते आठ साथीदारांसह आला होता. त्याने मद्यपान केलं होतं. तो कुणालातरी मारहाण करुन आला होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. पहाटे साडेतीनच्या दरम्यान महिला डॉक्टर तपास होती. त्यासाठी आधीपासून जखमेची पट्टी काढावी लागणार होती. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. नेमकं काय घडलं आहे हे पाहण्यासाठी जखमेची पट्टी काढावी लागते. यानंतर या रुग्णाने तिला शिव्या देण्यास सुरुवात केली. रुग्ण ओरडू लागल्याने इतर नातेवाईकांनी तिला शिव्या द्यायया सुरुवात केली. तिच्या दिशेने रक्ताने माखलेले बोळे फेकले. त्यावेळी महिला डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकाला बोलवलं म्हणून तिला गंभीर स्वरुपातली मारहाण झाली नाही, असं अक्षय मोरे यांनी सांगितलं आहे.









