
पुण्यात धनकवडीतील मुंगळे अण्णानगरमध्ये मुलगा मोबाईलवर मालिका पहात होता. मालिका संपल्याने आईने मोबाईल बंद केला. याचा राग आल्याने त्याने आईच्या डोक्यात लाकडी फ्रेम फोडली. कात्रीने मारण्याचा प्रयत्न केला. आपल्याच आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या.

लोकांना विचार करायला लावणारी ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली.याबाबत ३९ वर्षाच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहकारनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अल्पवयीन असून तो ९ वीत शिकत आहे. त्याच्या मनात असेल तर तो अधून मधून शाळेत जातो. मानसिक संतुुलन बिघडले असल्याने तो अनेकदा व्हायलंट होतो. त्यांचे पती हे चालक म्हणून नोकरी करीत असल्याने अनेकदा बाहेरगावी असतात.घरात ते दोघेच असतात.

सोमवारी रात्री मुलगा मोबाईलवर मालिका पहात होता. रात्री साडेदहा च्या सुमारास मालिका संपल्याने आईने मोबाईल बंद केला. याचा राग येऊन मुलाने आईच्या डोक्यात शिवाजी महाराजाची लाकडी फ्रेम मारुन फोडली. त्यानंतर कात्रीने मारायला आला. तेव्हा आईने तो वार चुकवला. मुलाने आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. मुलाने यापूर्वीही आईला मारहाण केली होती़ या प्रकारामुळे आई घाबरुन गेली़ कालचा प्रकार आपल्या जीवावर बेतला असल्याचे त्यांना जाणवल्याने आईने तक्रार दिली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी सांगितले. याबाबत पोलीस हवालदार जाधव तपास करीत आहेत.









