
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – इंडोनेशियातील साऊथ तपानुली प्रांतात २९ जुलैच्या रात्री धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला आहे. ४५ वर्षीय पारलिंदुंगन सिरगारनं त्याच्या शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय असगिम इरियंटोची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येमागचं कारण एक साधा प्रश्न, तुमचं लग्न का नाही झालं?

२९ जुलैच्या रात्री ८ वाजता पारलिंदुंगन सिरगार असगिम इरियंटो यांच्या घरी हातात एक लाकडाचा तुकडा घेऊन पोहचला. त्याठिकाणी काहीही न बोलता त्याने असगिमवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे असगिम पळत पळत रस्त्यावर आल्या परंतु आरोपीने त्यांचा पाठलाग करत डोक्यावर वार केले. या हल्ल्यात असगिम यांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने केलेला दावा ऐकून पोलीस अधिकारी चक्रावले.

चौकशीत आरोपी पारलिंदुंगनने म्हटलं की, असगिम वारंवार माझ्या लग्नाबाबत प्रश्न विचारत असल्यानं मी नाराज होतो. लग्नावरून मस्करी करणं पसंत नव्हते त्यामुळे असगिमला मारण्याचं ठरवलं असं त्याने पोलिसांना सांगितले. असगिमची क्रूरपणे हत्या करण्यामागे कारण होतं ते म्हणजे असगिम सातत्याने पारलिंदुंगनला मस्करीनं तुझं अजून लग्न का झालं नाही असा सवाल विचारत होता. त्याचाच राग डोक्यात ठेवत आरोपीने असगिमवर हल्ला केला. दरम्यान, या घटनेमुळे इंडोनेशियात खळबळ माजली आहे.









