अंधश्रद्धेतून कोल्हापुरमध्ये गुप्त धनासाठी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले आहे. तसेच, हे प्रकरण नेमके काय आहे? यामागे कोणाकोणाचा हात आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील कौलव गावातल्या एका घरामध्ये चार ते पाच फूटांचा खड्डा खणला असल्याचे निदर्शनास आले आहे. या खड्ड्याच्या बाजूलाच मंत्रोच्चार करणारा, गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेला एक साधू बसला होता. घराच्या शेजारच्यांना हे मंत्रोच्चार ऐकून संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर त्यांना देवघरामध्ये खड्डा खाल्ल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी चौकशी केली तर हा खड्डा गुप्तधन मिळवण्यासाठी खोदण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महत्वाचे म्हणजे, या खड्ड्याच्या बाजूला पानविडा, फुल आणि इतर अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. हे दृश्य सर्वांनाच विचलित करणारे होते. या सर्व घटनेमध्ये संशय व्यक्त केला जात आहे की, गुप्तधन मिळवण्यासाठी या ठिकाणी नरबळी देण्यात आला असावा. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत ६ जणांविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शरद माने नावाचा व्यक्ती मुख्य आरोपी आहे. आता पोलीस शेजारच्यांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारावर घटनेचा तपास करत आहे.