राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. गावागावात कार्यकर्ते एकत्र येत आहेत. वार्ड आणि प्रभागतही नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. गेल्या ८ दिवसांपासून प्रचारसभांनी जोर धरला आहे.यादरम्यान गावात किंवा कार्यकर्त्यांच्या शेतात बैठकांचे व पार्ट्यांचा जोर वाढला आहे. या पार्टीदरम्यान चंद्रपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात एका राजकीय पक्षाने आयोजित केलेली पार्टी कार्यकर्त्याच्या जीवावर बेतली, या पार्टीसाठी आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रविवारी रात्री पार्टी आयोजित केली होती. यात जवळच्या पांझुर्णी गावातील माजी उपसरपंच गजानन काळे हे देखील सहभागी झाले होते.
पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले आणि तेथील विहिरीत पडले. काहीतरी पडल्याचा आवाज येताच सगळे त्यांच्या दिशेने धावले. पडलेल्यांपैकी एकाला पोहता येत असल्याने तो बचावला. मात्र, गजानन काळे यांचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा अद्याप दखल करण्यात आलेला नाही. हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.