पिंपरी चिंचवडमध्ये एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय तरुणीची हत्या केली आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे संबंधित परिसरात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
राज्यातील महिला आणि मुली खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पनवेलच्या उरण येथील घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेलं आहे. असं असताना पनवेल येथील न्हावा गावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या दोन घटनांनंतर पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथून देखील अशीच एक सुन्न करणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे.
पुण्यात एकतर्फी प्रेमातून लग्नास नकार दिल्याने चाकूने गळ्यावर व पोटावर वार करून तरुणीचा खून केल्याची घटना महाळूंगे एमआयडीसीतील आंबेठाण येथे घडली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीन च्या पथकाने आरोपीचा पाठलाग करून सातारा-कराड रोड येथून अटक केली. प्राची विजय माने, वय २१ असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. अविराज रामचंद्र खरात याला अटक केली आहे. आंबेठाण येथे मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून झाल्याची माहिती रविवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने अविराज याने गळ्यावर व पोटावर चाकूने वार करुन प्राचीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्राचीचा मोबाइल फोन देखील सोबत घेऊन तो पसार झाला होता. अविराज हा दुचाकीवरून सातारा-कराड रोडवरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून अविराज याचा १५ किलोमीटर पाठलाग केला. पोलिसांना पाहताच अविराज पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाईल संच, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. महाळूंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.