धक्कादायक! १२ वर्षांच्या मुलीला विष देऊन पती -पत्नीनेही केली आत्महत्या

कॅन्सर पीडित महिलेच्या उपचारांसाठी केरळवरून नागपूरमध्ये आलेल्या एका दांपत्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे मरण्यापूर्वी त्या जोडप्याने त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीला देखील विष दिले.मात्र ती मुलगी बचावली असून पती व पत्नी या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतील विजयश्री नगर येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.  रिजू नायर असे पतीचे तर प्रिया रिजू नायर असे मृत पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दांपत्य मूळचं केरळ येथील आहे. प्रिया रिजू नायर यांना ब्लड कॅन्सर झाला होता. त्यानी केरळमधील रुग्णालयात उपचार घेतले, मात्र फारसा फायदा न झाल्याने ते दांपत्य मुलीसह नागपूरमध्ये आलं. दोन महिन्यांपासून ते नागपूरमध्येच रहात होते. नागपुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र या उपचारांसाठी महागडी औषधं आणि इंजेक्शन घ्यावी लागत असल्याने त्यांचा आर्थिक विवंचना जाणवत होती.

पत्नीच्या उपचारांसाठी जवळचे सर्व जमा पैसे संपल्यावर त्यांनी कर्जही घेतले. पण डॉक्टरांनी सांगितलेले औषध, इंजेक्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नव्हते. सुरवातीला गावाकडून नातेवाईकांना मदत केली, पण वेळीच औषध न मिळू शकल्याने प्रिया यांना वेदना होत होत्या. अखेर त्या दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रीजु नायर यांनी पत्नी प्रिया आणि मुलीला शीतपेयातून विष दिलं आणि स्वतः ही विषयुक्त शीतपेय पिऊन आत्महत्या केली. त्यात पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला. मात्र त्यांची १२ वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली . तिची प्रकृती सध्या गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.