धक्कादायक ! दारुच्या नशेत शिवशाही चालकाने दिली कारला धडक ; बस कंडक्टरनेच केली पोलिसात तक्रार

पुणे – दारुच्या नशेत शिवशाही बस चालविताना चालकाने बेदकारपणे कारला धडक दिली. त्याची बसचा कंडक्टर यानेच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी या शिवशाहीच्या चालकाला अटक केली.

महेश शिवाजी पुंड असे या चालकाचे नाव आहे. याबाबत राम मधुकर चिते यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पिंपरी चिंचवड एस टी आगार येथे वाहक चालक म्हणून काम करीत आहेत. पिंपरी चिंचवड आगार येथून ते २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता हैद्राबाद येथे जाण्यास निघाले. त्यावेळी एस टीमध्ये बिघाड झाल्याने ते शिवशाही एस टी घेऊन स्वारगेट निघाले. चालक म्हणून महेश शिवाजी पुंड व प्रशिक्षणार्थी वाहक कुशाल काकनाटे यांच्यासह जात होते. बसमध्ये १३ प्रवासी होते. गोळीबार मैदान येथे सिग्नलला चौकात बस आली.

सिग्नल सुटल्यानंतर चालक महेश पुंड याने अचानक बस डाव्या बाजूस घेतल्याने शेजारीच कारला एस टीचा धक्का लागला. त्यात कारचे उजव्या बाजूकडील दरवाजा चेंबून नुकसान झाले. त्यावेळी कारचालक व महेश पुंड यांच्यात वाद झाला. तेव्हा महेश पुंड हा दारुच्या नशेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेऊन तपासणी केली. त्यात त्याने मदय सेवन केल्याचे निष्पन्न झाले. दारु पिऊन नशेच्या अंमलाखाली वाहतूकीचे नियमाकडे दुर्लक्ष करुन बसमधील प्रवासी व रस्त्यावरील वाहनचालक यांच्या जीवीतास धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. वानवडी पोलीस तपास करीत आहेत.