
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडलावलेरू कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मुलींच्या वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला आहे.या कॅमेऱ्याने बनवलेले काही व्हिडिओ कथितपणे विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला आहे. छुप्या कॅमेऱ्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजच्या वसतिगृहातील टॉयलेटमध्ये ठेवलेला हा कॅमेरा एका विद्यार्थ्याला सापडला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुवारी रात्री विरोध केला.कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गोपनीयतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या छुप्या कॅमेऱ्यातून ३०० हून अधिक व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले आणि कथितपणे मुलांच्या वसतिगृहात प्रसारित केले गेले. गुरुवारी रात्रीच विद्यार्थिनींनी हा व्हिडिओ पोस्ट करून व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. आंदोलनादरम्यान या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. कॅमेरा बसवण्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही आणि पुढील तपास सुरू आहे. मात्र, मुलींच्या वसतिगृहात छुपा कॅमेरा सापडला नसल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे. पोलिस तपासात ते सहकार्य करत आहे. कॅम्पसमध्ये अतिरिक्त सुरक्षा उपाय करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. दुसरीकडे, पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपींचे लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटची तपासणी केली आणि कोणताही आक्षेपार्ह पुरावा सापडला नाही. पुढील तपास सुरू आहे.









