पुण्यात कॅडबरीत अळी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर ; ग्राहकाने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

लहान असो वा मोठं व्यक्ती अनेकांना कॅडबरी म्हणलं तर तोंडाला पाणी सुटतं.अशातच पुण्यात कॅडबरीत अळी आढळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अक्षय जैन यांनी ‘कॅडबरी टेंप्टेशन्स रम आणि मनुका प्रीमियम चॉकलेट बार’ ही कॅडबरी विकत घेतली होती. त्यांनी ती खाण्यासाठी तिचे पॅकेट फोडले. यावेळी त्यांनी कॅडबरीचा तुकडा तोडला असता त्यात त्यांना दोन अळ्या दिसल्या. अक्षय जैन यांनी त्याचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवत या बद्दल तक्रार केली.

या तक्रारीवर कंपनीने घटनेसंदर्भात खेद व्यक्त केला आहे. भविष्यात आमच्या उत्पादनांमध्ये असे काही आढळल्यास आम्हाला जरूर कळवा. तसेच ते चॉकलेट आम्हाला परत पाठवा. त्याबाबत आम्ही योग्य तपास करू व तुम्हाला उत्तर देऊ. कंपनीच्या या उत्तरावर अक्षय जैन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कॅडबरीची गुणवत्तेबाबत ही ग्राहकांसाठी धक्कादायक घटना आहे असे देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

पुण्यामध्ये पुन्हा कॅडबरीमध्ये अळी सापडल्याने ग्राहकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि एक्सपायरी डेटचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दरम्यान, डेअरी मिल्कच्या या चॉकलेटमध्ये यापूर्वीही अनेकदा अळी सापडल्याचे प्रकार घडले आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनावर तसेच त्यांच्या एक्सपायरी दिनांकावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.