
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ३० रुपयांसाठी एका इसमाला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला आहे. रिक्षाचं भाडं देण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि एक मित्रच दुसऱ्या मित्राच्या जीवावर उठला. त्याने मित्राला जबर मारहाण केली आणि त्याला तसाच जखमी अवस्थेत मरायला टाकून तो पळून गेला. पहाटेच्या सुमारास इतर लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या जखमी इसमाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

चक्कन अली असे मृत इसमाचे नाव असून तो २९ वर्षांचा आहे. तर सैफ जहिद अली असे मारेकरी आरोपीचे नाव असून मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला कल्याण रेल्वे स्टेशनमधून अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे कुर्ला येथील पॅलेस रेसिडन्सी बार बाहेर एका इसमाचा मृतदेह सापडला होता. चक्कन अअली असे त्याचे नाव होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, संशयाची सुई त्याचा मित्र सैफ याच्याकडे वळली. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत होते. तो तडकाफडकी उत्तर प्रदेशातील त्याच्या गोंडा या गावी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर मुंबई गुन्हे शाकेच्या कक्ष ५ च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सैफ याला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली.

चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी सैफ आणि मृत इसम चक्कन हे दोघेही मित्र होते. रविवारी रात्री ते धारावीतून कुर्ल्याला रिक्षाने आले. रिक्षाचं भाडं ३० रुपये झालं. मात्र ते पैसे कोणी द्यायचे यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता तो वाद खूप वाढला आणि टोकाला गेला. त्याच भांडणादरम्यान रागाच्या भरात सैफने चक्कनला मारहाण केली, तो गंभीर जखमी झाला. मात्र त्याला तशाच अवस्थेत टाकून सैफ तिथून पसार झाला. पहाटेच्या सुमारास काही लोकांनी त्याला जखमी अवस्थे पाहिलं आणि उपचारांसाठी रुग्णालयात नेलं पण तेथे डॉक्टरांन तपासून त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी आरोपी सैफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.









