सिन्नर फाटा भागात फुकट दारू न दिल्याने एकाने दुकान पेटविल्याची घटना घडली. दारूच्या दुकानातील काऊंटर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने मोठे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पोलीसांनी पसार झालेल्या संशयितास बेड्या ठोकल्या असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव उर्फ सोनू सुभाष भागवत असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. याबाबत सचिन रमेश वाघ यांनी फिर्याद दिली आहे. वाघ सिन्नर फाटा येथील हिरा वाईन्स या दारू दुकानावर व्यवस्थापक पदावर कार्यरत असून रविवारी (दि.१४) ते दारू विक्रीचा व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास आलेल्या परिचीत संशयिताने वाईन्स शॉपमधील कामगार विजय सोनकांबळे याच्याकडे तुमचे दुकान जर चालू ठेवायचे असेल तर मला रेड लेबलचा खंबा दे, मला जर खंबा दिला नाही तर मी तुमचे दुकान चालू देणार नाही अशी धमकी दिली होती.
यानंतर सव्वा चार वाजेच्या सुमारास येऊन संशयिताने खंबा न दिल्याचे सल मनात धरून बाटलीत भरूण आणलेले पेट्रोल काऊंटरवर टाकून ते पेटवून दिले. अचानक घडलेल्या या घटनेने दारू दुकानातील कर्मचा-यांसह ग्राहकांची पळपळ झाली. यावेळी संशयिताने तेथून पळ काढत धूम ठोकली. दुकानात मोठ्या संख्येने दारू साठा असल्याने कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखत पाण्याचा मारा केला. काऊंटर अचानक आगीचा भडका उडाल्याने काऊंटरसह छतालाही आगीने लक्ष केले. संपुर्ण दुकानात प्लाऊडचा वापर करण्यात आल्याने तसेच दारूही ज्वलनशिल पदार्थ असल्याने परिसरातील नागरीकांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेची माहिती पोलीसांसह अग्निशमन दलास कळविण्यात आल्याने अग्निशमन दलाच्या बंबसह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तत्पूर्वीच दुकानातील कामगारांसह स्थानिकांनी मदत कार्य हाती घेत पाण्याचा मारा केल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दुकानाचे मोठे नुकसान झाले असून, याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत.