
उत्तर प्रदेशातून आलेल्या दोन मित्रांना थेट मालकाला सांगून कामाला लावल्याचा राग धरुन सुपरवायझरने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली.याप्रकरणी राहुल कुमार हरि किशन यादव (वय १९) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुपरवायझर निलेशकुमार यादव (वय ४२) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल कुमार यादव हे हरिनारायण द्विवेदी यांच्या एस जी सिक्युरिटी एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांचे सुपरवायझर निलेशकुमार यादव आहेत. त्यांच्या गावाकडून दोघे मित्र आले होते. त्यांनी निलेशकुमार यादव यांना न सांगता थेट मालक द्विवेदी यांना सांगून सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लावले. त्याचा निलेशकुमार याला राग आला. फिर्यादी हे २८ सप्टेबर रोजी सारथी सोसायटीमध्ये कामावर होते.

यावेळी निलेशकुमार यादव तेथे आला. तुला लय मस्ती आली का, माझ्या परस्पर दुसरी पोर मालकाकडे कामाला लावतो, असे म्हणाला. वॉचमन टेबलावर असलेली काठी घेऊन त्याने फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मनगटावर, डाव्या पायाच्या मांडीवर, गुडघ्यावर मारहाण करुन दुखापत केली. शिवीगाळ करुन तुला येथे कामाला येऊन देणार नाही, तु गावाला निघुन जायचे, नाही तर मी तुला सोडणार नाही, अशी धमकी देऊन फिर्यादी यांचा मोबाईल आपटून फोडून टाकला. पोलीस अंमलदार खटके तपास करीत आहेत.









