धक्कादायक ! महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो केले व्हायरल, दोन मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल

महिलांचे सोशल मीडियावरुन फोटो घेऊन ते मॉर्फ करुन व्हायरल करण्याचे प्रकार घडत आहेत. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचे मॉफ केलेले अश्लील फोटो पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. तसेच पती व महिलेमध्ये गैरसमज निर्माण केले. हा प्रकार २५ जून ते३० जून या कालावधीत घडला आहे.

याबाबत ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन दोन मोबाईल धारकांवर आयपीसी
३५४(ड), ५००, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात मोबाईल धारकाने २५ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पती, मित्र व नातेवाईक यांना पाठवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन बदनामी केली.

तसेच फिर्य़ादी व त्यांच्या पतीमध्ये गैरसमज निर्माण केला. त्यानंतर २९ जून रोजी आरोपीने व्हॉट्सअॅपवर व्हाईस कॉल करुन फिर्य़ादी यांना पतीपासून घटस्फोट घेण्यास सांगितले. फिर्य़ादी यांनी याला नकार दिला असता आरोपीने वारंवार फोन करुन पुणे स्टेशन येथे भेटायला बोलवले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.