वाघोली येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीमध्ये पडून एका ६ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यु झाला आहे. रेखा मुकेशसिंग चौहाण (वय ६) असे मृत्यु पावलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत मुकेश कुमारसिंग चौहाण (वय २९) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बिल्डिंग मालक रमेश बालाजी मुंडे (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना चार मुले असून ते व त्यांची पत्नी ७ सप्टेंबर रोजी स्लॅब भरण्याच्या कामासाठी वडगाव शेरी येथे गेले होते. त्यांची मुले ते रहात असलेल्या ठिकाणी खेळत होते. सायंकाळी ६ वाजता ते परत आले. तेव्हा त्यांची मुलगी रेखा दिसली नाही़. म्हणून त्यांनी इतर मुलांना विचारणा केली. तेव्हा त्यांनी आम्ही खेळत असताना ती कोठे गेली माहिती नाही. त्यांना रात्री उशिरापर्यंत सर्वत्र शोध घेतला तरी ती मिळून आली नाही. रात्री साडेदहा वाजता त्यांनी वाघोली पोलीस चौकीत तक्रार नोंदविली. पोलिसांनी आसपास शोध घेण्यास सुरुवात केली.
ते रहात असलेल्या घरापाठीमागे रमेश मुंडे यांच्या मालकीची तीन मजली इमारतीचे अर्धवट बांधकाम झाले आहे. पोलीस शोध घेत असताना मध्यरात्री दीड वाजता या इमारतीच्या जिन्यालगत जमिनीमध्ये तयार केलेल्या, झाकण नसलेल्या टाकीमध्ये पोलिसांना रेखा पाण्यात बुडलेली आढळून आली. तळमजल्यावरील टाकीला अपघात होऊ नये, म्हणून झाकण लावणे गरजेचे असताना झाकण, जाळी अशा कोणत्याही सुरक्षेचा अवलंब न केल्याने रेखा चौहाण ही त्यात पडून तिचा मृत्यु झाला. त्याचा कारणीभूत ठरल्याबद्दल मुंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड तपास करीत आहेत.