गुन्हा करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक; आरोपीकडून गावठी पिस्टल, काडतुस जप्त

बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागण्यासह विविध ६ गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी आला असताना शिवाजीनगर पोलिसांनी त्याला गावठी पिस्टलासह जेरबंद केले. आंबाजी कल्याणी शिंगे (वय २४) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आंबाजी शिंगे याच्यावर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हत्यार बाळगण्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

याबाबत पोलीस अंमलदार श्रीकृष्ण सांगवे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी तसेच सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, दाबेराव, हवालदार दीपक चव्हाण, मोहिते, साठे, पवार, पोलीस अंमलदार सचिन जाधव, वलटे हे २२ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नाना नानी पार्क जवळील सुलभ शौचालय येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार आंबाजी शिंगे हा उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्टल आहे. या बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोहचले. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले़ त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे ३६ हजार रुपयांचे गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव, हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, अतुल साठे, राजकिरण पवार, पोलीस अंमलदार सचिन जाधव, महावीर वलटे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे.