शिवसेनेच्या ‘या’ खासदाराच्या गाडीचा अपघात

मुंबई – रविवारी मध्यरात्री शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झाला आहे. अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीत होते. दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती समोर आली आहे.

जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ ट्रक चालकाने रवींद्र वायकर यांच्या गाडीला धडक दिली. सुदैवाने या अपघातात रवींद्र वायकर यांना कोणतीही इजा झालेली नाही. या प्रकरणी खासदार रवींद्र वायकर यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या अपघातात वायकर यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. मध्यंतरी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या खासदारकी कायम ठेवली आहे.

रवींद्र वायकर यांनी एप्रिलमध्ये ठाकरे गटाला रामराम ठोकून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी वायकर मुंबईतील जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांचा त्यांनी अवघ्या ४८ मतांनी पराभव करत विजय मिळवला होता.