शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा अडचणीत ; निवडणुक आयोगाच्या वतीने बांगर याना नोटीस, नेमके प्रकरण काय?

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे.आचारसंहितेचा पहिला फटका शिवसेनेला बसल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आमदार संतोष बांगर हे अडचणीत आल्याचे समजते.आमदार संतोष बांगर यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे.बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना फोनपे वरून पैसे पाठवण्याचे आमिष दिल्याचा आरोप बांगर यांच्यावर करण्यात आला.

शुक्रवारी कळमनुरीमध्ये आयोजित एका कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांनी मतदारांना आणण्यासाठी पैसे फोन पे ने पाठवा असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना पैशाचं प्रलोभन दिल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार अजित मगर यांनी केली आहे.निवडणुक आयोगाच्या वतीने आमदार संतोष बांगर यांना आपल्या वक्तव्याचा खुलासा सादर करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. पुढील २४ तासांमध्ये आमदार बांगर यांनी खुलासा सादर करावा, असं त्या नोटीसमध्ये म्हटले.

दरम्यान या प्रकरणावर संतोष बांगर यांनी प्रतिक्रिया दिली. संतोष बांगर यांनी सर्व आरोप फेटाळून लावताना तो व्हिडिओ आपला नसल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर फोन पे चा अर्थ मला माहित नाही, गुगल पे सुद्धा माहित नाही असंही संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर मी हेच उत्तर देणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले.