पुण्यातील शरद पवार यांची सभा रद्द, राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या सभेवर सावट

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या जंगी सभा होत आहेत. पुण्यामध्ये येत्या 13 तारखेला मतदान होणार आहे. मात्र अवकाळी पावसाने आज लावलेल्या हजेरीने महाविकास आघाडीला याचा फटका बसलाय. पुण्यातील प्रचारसभा पाण्यात गेल्या आहेत. पुण्यामध्ये झालेल्या पावसामुळे शरद पवार यांची पुण्यातील सभा रद्द झाली आहे. शरद पवारांसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द झाला आहे.

पुण्यातील वडगाव शेरीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्या सभा होणार होत्या. पण मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीचे सभा रद्द झाली आहे. पुण्यात ज्या ठिकाणी मविआची सभा होणार होती त्या ठिकाणी पाणी साचलं आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा जालना दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरेंची संभाजीनगरमधील सभा होण्याबाबत अद्याप संभ्रम आहे.

राज ठाकरे- देवेंद्र फडणवीसांच्या सभेवर सावट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा होणार होती. राज ठाकरेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा होणार होती. मात्र अवकाळी पावसामुळे पुण्यातील महायुतीच्या सभेवरही पावसाचं सावट असणार आहे.