
कण्हेरी गावात युगेंद्र पवार यांच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांनी अजित पवारांबाबत केलेल्या नक्कलेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.याच दरम्यान शरद पवारांनी केलेल्या ‘नक्कल’ वर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, ” शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे प्रगल्भ नेत्याने मुलाप्रमाणे असलेल्या माझी नक्कल करणे योग्य नाही. साहेबांनी नक्कल करणं अनेकांना आवडलं नाही. युगेंद्र पवारांनी किंवा इतरांनी केलं असतं तर ठीक होतं.इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले. मी शरद पवार साहेबांना देव मानलं. त्यांनी माझी नक्कल केली. मी घरचा मुलगा होतो. माझी नक्कल त्यांनी करणे योग्य नव्हतं, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ” शरद पवारांना ज्या उंचीवर देश बघतो, महाराष्ट्र बघतो…त्या मोठ्या नेत्याने माझी केलेली नक्कल अनेकांना पटली नाही. मी रात्र-दिवस एक करुन सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं. मी रुमाल काढला नव्हता, त्यांनी रुमाल काढला.मी आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. कधी-कधी असं होतं. पण माझं रडणं नैसर्गिक पद्धतीने झालं. पण मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल केली याचं खूप वाईट वाटलं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.









