शिरूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारानिमित्त मी राज्यभर फिरतोय.प्रचंड संख्येने महिला, तरुण, वडीलधारे सभेला येत आहेत. तासनतास बसतात, विचार ऐकतात आणि सांगतात तुम्ही चिंता करू नका, महाराष्ट्र चांगल्या लोकांच्या हातात द्यायचा ही तुमची अपेक्षा आहे, त्याची पूर्तता आम्ही करू, असे सांगून महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन अटळ आहे, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिरूरमध्ये व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील शिरूरच्या वडगाव रासाईमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अशोक पवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. भाषणाच्या सुरुवातीलाच रावसाहेब पवार यांचे तालुक्यातील योगदान शरद पवार यांनी अधोरेखित केले. तालुक्यातील शेती सुधारली, दुधाचा धंदा वाढला, कारखाने उभे राहिले, औद्योगिक वसाहती झाल्या, तालुक्याचा चेहरा बदलतोय, याचा आनंद आहे. अलीकडच्या काळात इथली जबाबदारी अशोकरावांच्या खांद्यावर होती.
त्यांनी ती व्यवस्थित पार पाडली, असे म्हणत शरद पवार यांनी शाबासकीची थापही दिली. या सभेला तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्षात फूट पडलेली असताना अशोक पवार यांनी निष्ठा दाखवून माझ्यासोबत राहणे पसंत केले, असे सांगून निष्ठावंताच्या मागे ताकदीने उभे राहा, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे काम करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.