आगीत सात जणांचा मृत्यू, कुटुंबातील कोणीच जिवंत नाही, अंत्यविधी कोण करणार ? मन हेलावून टाकणारी घटना

छत्रपती संभाजीनगर शहरात बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील छावनी परिसरात असणाऱ्या टेलरच्या दुकानाला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या अग्नितांडवात 2 पुरुष, 3 महिला आणि 2 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. या आगीत संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले आहे.

आगीमुळे धुराचे प्रचंड लोट छावणी परिसरात निर्माण झाले होते. जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या दुमजली घरात ही आग लागली. या घरातील पहिल्या मजल्यावर पहाटे गाढ झोपेत असणाऱ्या लोकांना खाली उतरण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे गुदमरून सात जणांचा मृत्यू झाला. आगीचे वृत्त समजताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्नीशमन दलाने आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. घरात असणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. त्यात मृत्यू झालेल्या सात जणांशिवाय एक जण मिसिंग आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मृतांमध्ये आसिम वसीम शेख, परी वसीम शेख, वसीम शेख (30 वर्ष), तन्वीर वसीम (23 वर्ष), हमीदा बेगम (50 वर्ष), शेख सोहेल (35 वर्ष), रेशमा शेख (22 वर्ष) यांचा समावेश आहे.

आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. आगीत संपूर्ण कुटुंबातील लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या कुटुंबातील अंत्यविधी करण्यासाठी घरातील कोणीच राहिले नाही. आगीत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली, त्याचे कारण समजू शकले नाही. पंचनामा करून मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी पाहणी केली आहे.