सेकंड वाॅल! चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती

भावनिक पोस्ट शेअर करत केली निवृत्तीची घोषणा, म्हणाला भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि….

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो बराच काळ भारतीय कसोटी संघाबाहेर होता. सोशल मिडियावर पोस्ट करत पुजाराने ही घोषणा केली आहे.

चेतेश्वरने निवृत्तीची घोषणा समाज माध्यमावरून केली आहे. त्यात त्याने एक भावनिक पत्र लिहिले आहे. ‘भारतीय जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीत गाणं आणि प्रत्येक वेळी मैदानावर उतरताना आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणं, असं नमूद करतानाच, पण म्हणतात ना, प्रत्येक चांगल्या गोष्टीचा एक शेवट असतो आणि आता तो आला आहे. मी भारतीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाचे प्रेम आणि तुमचा पाठिंबा याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!’ असे चेतेश्वर पुजाराने समाज माध्मम X वर लिहिले आहे. चेतेश्वर पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय कसोटी संघासाठी पदार्पण केले. त्यानंतर, चांगल्या कामगिरीच्या जोरावर तो भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला. राहुल द्रविडनंतर त्याला कसोटीची भिंत म्हटले जाऊ लागले होते. त्यानंतर १३ वर्षांत म्हणजे २०२३ पर्यंत तो १०३ कसोटी सामने खेळला. त्यात त्याने ७ हजार १९५ धावा केल्या. शिवाय १९ शतके आणि ३५ अर्धशतकांची त्याची कामगिरी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याच्या नावावर तीन डबल सेन्चुरी आहेत. तो केवळ ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये झळकला. या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने फक्त १५ धावा केल्या. पुजाराला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. दरम्यान पुजाराने त्याच्या पोस्टमधून बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले आहेत. याशिवाय त्याने प्रतिनिधित्व केलेल्या सर्व संघांचे, आयपीएल फ्रँचायझीचे आणि काऊंटी क्रिकेट संघांचेही आभार मानले आहेत.

पुजारा आपल्या फलंदाजी तंत्रासाठी आणि संयमासाठी प्रसिद्ध होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील टेस्ट सिरीजमध्ये भारताने मिळवलेल्या विजयांमध्ये त्याचा मोठा वाटा राहिला. कठीण परिस्थितीत क्रीजवर टिकून डाव सावरण्याची क्षमता त्याच्यात होती.