
(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – घराण्याला वारस हवा, या हट्ट्यापायी दोन मुलीवर तिसरे अपत्य मुलगा हवा, यासाठी विवाहितेचा शारीरीक मानसिक छळ केला गेला. या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

शिवानी स्वप्नील पात्रे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत शिवानीचे वडिल विलास गोंविद बालवडे नी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती स्वप्नील संतोष पात्रे (वय २८), सासू आशा संतोष पात्रे (वय ४४), मावस सासू नंदा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी ३ ऑगस्ट रोजी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शिवानी हिचा विवाह स्वप्नील पात्रे याच्याशी झाला होता. त्यांना दोन्ही मुली झाल्या. त्यावर पती स्वप्नील, सासू आशा व शेजारी राहणारी मावस सासू नंदा यांनी तुला दोन्हीही मुली झालेल्या असून आम्हास वारस म्हणून तिसरे अपत्य मुलगा हवा आहे. त्यासाठी तू तिसरे अपत्य मुलगा होऊ दे, अन्यथा आम्ही स्वप्नीलचे दुसरे लग्न लावून देऊ, असे म्हणून शिवानी हिचा वेळोवेळी शारीरीक, मानसिक छळ करुन शिवीगाळ, मारहाण करत होते़. या छळाला कंटाळून शिवानी हिने आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करीत आहेत.









