दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप सोनवणे

उरुळी कांचन, (प्रतिनिधी):- पुणे जिल्हा प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली चौफुला (ता. दौंड) येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ मंदिरात गुरुवारी दि. २७ रोजी अन्य पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सुनील जगताप व कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूसाहेब काळभोर यांनी दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर केली. पुणे जिल्हा प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पुढारीचे राहु (ता. दौंड) येथील बातमीदार संदीप शिवाजी सोनवणे यांची निवड करण्यात आली. तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी संदीप सिद्धार्थ भालेराव (पश्चिम विभाग) व विलास जयवंत कांबळे (पूर्व विभाग) या दोघांची निवड करण्यात आली आहे. तर ‘पुणे प्राईम न्यूज’चे यवत येथील बातमीदार राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांच्यावर सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील जगताप म्हणाले, ‘एकच ध्यास पत्रकारांचा विकास’ हे ब्रीदवाक्य घेऊन जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम सुरु केले आहे. यापुढील काळात पत्रकारांसाठी आरोग्य, निवारा या गोष्टींवर भर देणार असून, पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर प्रिंट व डिजिटल मीडिया ही संघटना काम करणार आहे. पुढील एक महिन्याच्या काळात संघटना वाढीसाठी इंदापूर, भोर, पुरंदर, खेड तालुक्यात लक्ष दिले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्याने आपली कार्यकारिणी जाहीर करुन पुढाकार घेतल्याने त्यांचे संघटनेच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणारा अन्याय व अत्याचाराला नेहमीच वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटना खंबीरपणे उभी राहील. असेही जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

संघटनेचे कार्याध्यक्ष या नात्याने उपस्थितांना मार्गदर्शन करताना जनार्दन दांडगे म्हणाले, ‘पत्रकार व त्यांच्या कुंटुबियांच्या आरोग्याच्या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून सर्वाधिक भर दिला जाणार आहे. हवेली तालुक्यातील पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांवरील उपचारात भरीव सवलत मिळावी. यासाठी पुण्यातील तीन बड्या रुग्णालयसोबत बोलणी चालू आहेत. हवेलीप्रमाणेच दौंड तालुक्यातील पत्रकारही त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत’. दौंड तालुक्यातील पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारणीसाठी श्री बोरमलनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास शेलार यांनी एक एकर जागा देण्याचे जाहीर केले आहे. त्याबद्दल संघटना त्यांची ऋणी राहील. योग्य कागदपत्रांसह या जागेचा प्रस्ताव संघटनेकडे प्राप्त झाल्यास राज्य पातळीवर पाठपुरावा करून भव्य असे पत्रकार भवन उभारणीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.याशिवाय, जिल्ह्यातील पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात संघटना आक्रमकपणे पाठीशी उभी राहणार असल्याचेही जनार्दन दांडगे यांनी यावेळी म्हटले आहे.

दौंड तालुक्यातील पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले, ‘एकच ध्यास पत्रकारांचा विकास’ हे ब्रीदवाक्य असलेले व पत्रकारांच्या विविध समस्या व हक्कासाठी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ कार्यरत आहे. याच संघाच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. तालुक्यात कोणताही पत्रकार कोणत्याही संघात असला तरी आमच्या संघाच्या माध्यमातून त्या पत्रकार बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा मानस राहणार असल्याचेही सोनवणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी संघटनेचे राज्याचे सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, जेष्ठ सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, साप्ताहिक रॉयल मिडिया न्युज चे संपादक तथा जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दुंडे, उपाध्यक्ष अमोल अडागळे, समन्वयक अमोल भोसले, रियाज शेख, राजेंद्र हजगुडे, सुधीर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पत्रकार राजेंद्र खोमणे, सोनबा ढमे, अनिल गायकवाड, दत्ता डाडर, अक्षता हानमघर आदी पत्रकार सहकाऱ्यांनी पत्रकारांच्या असलेल्या समस्या व संघटना याबाबतीत मनोगत व्यक्त केले.