साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन

पुणे –  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली, समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. अण्णा भाऊंचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहेत. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे. रशियामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतो.  भारत माता आणि मराठी मातीच्या या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे. अण्णा भाऊंनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, सिनेमा, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा प्रकारे साहित्यातील प्रत्येक प्रकारात बहारदारपणा आणला आहे. ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहणारे विलक्षण प्रकारचे ते व्यक्तिमत्व होते. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पी.एचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, अण्णा भाऊंनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावना, वेदना, संवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही. त्यांचे साहित्य समाजाला एकत्रित करणारे आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतामध्ये  तरुणाईला स्फुर्ति देण्याचे काम केले. कार्यक्रमापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.