मिरजेतील प्रतिष्ठित लॅन्ड ब्रोकर, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शेत जमिनीच्या वादातून मानेवर कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांवर गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.
सुधाकर खाडे यांनी मिरजेत पंढरपूर रस्त्यावर राम मंदिरालगत चंदनवाले मळा येथील पावणेचार एकर जमीन सचिन जगदाळे यांच्याकडून विकसनासाठी घेतली होती. मात्र यास लक्ष्मण चंदनवाले यांनी हरकत घेतल्याने गेले काही महिने खाडे यांच्यासोबत त्यांचा वाद सुरू होता. या जागेवर कुंपण घालण्यासाठी सुधाकर खाडे, आप्पा ओतारी, ओंकार पवार यांच्यासह आठ ते दहा साथीदारांसोबत गेले होते. यावेळी शेत जमिनीचे कब्जे धारक चंदनवाले कुटुंबीय व सुधाकर खाडे यांच्यात जोरदार वादावादी झाली.यावेळी रागातून कार्तिक चंदनवाले याने कुऱ्हाडीने अचानक मागून सुधाकर खाडे यांच्या मानेवर हल्ला केला. कुऱ्हाडीचा मानेवर वर्मी घाव बसल्याने खाडे यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी खाडे यांच्या साथीदारांवर हल्ला चढविल्याने तेथे मोठा गोंधळ उडाला होता. खाडे यांना मिरजेत खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र ते मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.खुनानंतर कार्तिक चंदनवाले या आरोपीस पोलिसांनी अटक केली. दरम्यान सुधाकर खाडे यांच्या खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. खाडे यांच्या खुनाच्या घटनेचे मोबाईलवर चित्रण झाले आहे. याप्रकरणी गांधी चौक पोलिसात कार्तिक चंदनवाले लक्ष्मण चंदनवाले, शंकर चंदनवाले, काशिनाथ चंदनवाले यांच्यासह तीन महिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.