
बीड जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, कुटुंबाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, डाॅक्टर व पोलीस वादात?

बीड – मागील दोन महिन्यापासून राज्यात बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संतोष देशमुख खून प्रकरणामुळे तर चांगलेच वादळ उठले आहे. पण आता बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेग आला आहे. पण यावेळी एक चिंताजनक कारण समोर आले आहे. कुटुंबातील सदस्याला एड्सची लागण झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरुणीचा मागील १० ते १२ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पीडित महिलेचा मृत्यू ब्रेन ट्युमरने झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. मात्र मुलीवर अंत्यसंस्कार झाले त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबीयांना मुलीला एचआयव्ही असल्याचं सांगत कुटुंबीयांनाही टेस्ट करून घेण्यास सांगितले. पण गावात मात्र मुलीचा मृत्यू एड्स म्हणजेच एचआयव्हीने झाल्याची अफवा पसरली. ज्या कुटुंबातील मुलीचा मृत्यू झाला, त्या कुटुंबाच्या शेजारी उभ राहायलाही लोक तयार नाहीत. तसेच गावातील लोकांनी आपल्याबरोबरचे सर्व व्यवहार थांबवत वाळीत टाकले असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पीडित कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी या विभागाची तक्रार सुद्धा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मुलीचा एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. यामुळे समाजात बदनामी झाल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. तसेच. बदनामीमुळे घरातील महिलांनी दोन वेळा जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे. सासरकडील मंडळींच्या सांगण्यावरून हा खोटा अहवाल आरोग्य विभागाने दिल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. तसेच याविषयीची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
याप्रकरणी कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ. ढाकणे आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे यांनी आपण असे काहीही सांगितले नसल्याचा निर्वाळा दिला आहे.









