
उद्या होणार निर्णय?, संक्रातीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या पतीच्या खिशाला कात्री?

मुंबई – राज्यातील प्रवास आता महागणार आहे.रिक्षा, टॅक्सी, एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रिक्षा, टॅक्सी आणि एसटीच्या तिकीटाचे दर १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच परिवहन विभागाचा आढावा घेतला. त्या बैठकीत टॅक्सी, रिक्षा, शहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्याबाबात निर्देश दिले होते. त्याचबरोबर मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही, असे सांगत एसटी महामंडळाकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीटदरवाढ झाली होती. त्यानंतर कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. एसटी महामंडळाचा प्रस्ताव सरकारने मान्य केला तर १०० रुपयांच्या तिकीटामागे १५ रुपये अधिक मोजावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार , रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात ३ ते ४ रुपयांनी, तर बसच्या तिकीट दरामध्ये १ ते ५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या १५ जानेवारीला म्हणजे बुधवारी होणाऱ्या बैठकीत या भाडेवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता आहे. सरकारकडे रिक्षा, टॅक्सीचालक संघटना, एसटी महामंडळ आणि इतर शहरांतील परिवहन उपक्रमांनी भाडेवाढीसंदर्भात विविध प्रस्ताव दिले आहेत. यासंदर्भात एकत्रित निर्णय घेतला जाणार आहे. ही दरवाढ किमान १५ टक्के असण्याची शक्यता आहे. दरम्यान सप्टेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली होती. रिक्षाच्या भाड्यात २ रुपयांनी आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
गेल्या २ वर्षांत प्रवासी भाड्यात वाढ झालेली नाही त्यामुळे रिक्षाचालक संघटनांनी पुन्हा भाडेवाढीसाठी सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. दरवाढीवर प्रवाशांनी नाराजी दाखवली असून एकीकडे लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले जाते तर दुसरीकडून भाडेवाडीच्या रूपाने घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.









