राज्यातील रिक्षाचालकांना मिळणार १० हजार रुपये

राज्य सरकारची मोठी घोषणा, हे आहेत नियम, इतक्या रिक्षाचालकांना होणार फायदा

मुंबई – महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी किमान पाच वर्षे नोंदणीकृत असलेल्या ६५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या चालकांना १०,००० रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. याचा हजारो रिक्षाचालकांना फायदा होणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळाची बैठक झाली. या बैठकीत वय वर्ष ६५ आणि अधिक वय असलेल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना रुपये १० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. या निर्णयाचा राज्यातील १४,३८७ चालकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्या चालकांनी कल्याण मंडळात किमान पाच वर्षांसाठी सदस्यपद घेतलेले आहे, अशाच चालकांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. राज्यात जवळपास ९ ते १० लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक आहेत. यापैकी अनेक चालक हे असंघटित असून ते कोणत्याही औपचारिक सामाजिक सुरक्षा लाभापासून दूर आहेत. चालकांना मदत करता यावी यासाठी राज्य सरकारने कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या चालकांना १०,००० रुपये अनुदान दिले जाईल. याशिवाय, कल्याण मंडळाने आरोग्य विमा, मृत्यू आणि अपंगत्व विमा, तसेच चालकांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप कार्यक्रमही सुरू करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना ५०० रुपये नोंदणी आणि ३०० रुपये वार्षिक वर्गणी असे एकूण ८०० रुपये भरून मंडळाचे सदस्यत्व घेता येईल.

आनंद दिघे यांच्या जयंतीदीनी म्हणजेच २७ जानेवारी रोजी “धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याण मंडळा”ची स्थापना करण्यात आली होती. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने या मंडळाची स्थापना झाली. मंडळासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे.