नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्पाचा आढावा

कामे गतीने करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांच्या सूचना, मान्यता मिळताच या उपसा सिंचन योजनेची कामे सुरू

मुंबई – नीरा देवधर प्रकल्प, गुंजवणी-चापेट प्रकल्प, वरसगाव, पानशेत व मुळशी धरण प्रकल्पबाधितांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

या प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेताना जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, वाजेघर, वांगणी, शिवगंगा उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश करण्यात आला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळताच या उपसा सिंचन योजनेची कामे सुरू केली जातील. नीरा देवधर प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अंतिम टप्यात असून तेही लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. वरसगाव, पानशेत व मुळशी धरण प्रकल्प बाधितांच्या समस्या बाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. महसूल विभागाने या ठिकाणच्या गावठाणांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव जलसंपदा विभागास सादर करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या. तत्पूर्वी पलूस (जि. सांगली) तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारणा करण्यासाठी उपाय योजनांबाबत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली या बैठकीस आमदार विश्वजीत कदम उपस्थित होते. क्षारपड जमीन सुधारणेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचे सुधारित मापदंड करण्याची कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी पाटबंधारे महामंडळांनी क्षारपड जमिनीचा सर्व्हे करावा, अशा सूचना या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

पाण्याचा निचरा न झाल्याने जमिनी क्षारपड प्रमाण वाढते ही चिंतेची बाब आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी निचरा कॅनॉल स्वच्छ ठेवण्यासाठी महामंडळस्तरावर सर्वसमावेशक योजना राबवावी, अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या. या बैठकीत कडेगांव तालुक्यातील ढाणेवाडी गावास पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.