
आरटीओचे रिक्षा चालकांना आदेश, ‘या’ रिक्षांचे परमिट होणार रद्द, ही शेवटची तारीख

पुणे – सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये व उद्योगात नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटोरिक्षा परवाना घेतला आहे, त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावेत, असे आदेश प्रादेशिक परिवहन विभागाने दिले आहेत.

पुणे शहराची लोकसंख्या ८० लाखांच्या पुढे आहे. नागरिकांना प्रवाशांच्या सोईसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमीट दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार हे परवाने दिले जातात. लोकसंख्येनुसार २०१७ पर्यंत पुणे शहरात ४६ हजार ४ रिक्षांना परवाने देण्यात आले होते. नव्याने रिक्षा परवाने देण्यास सुरू केल्यानंतर अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्या भरमसाठ वाढली आहे. पुण्यात सध्या ८३ हजारांपेक्षा जास्त रिक्षा परवाने देण्यात आले आहेत. तर, पिंपरी चिंचवड परिसरात देखील ४० हजार रिक्षा परवाने दिले आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा परवाना देताना संबंधित व्यक्ती सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करत नसल्याची अट आहे. रिक्षा परवाना देण्यासाठी संबंधित व्यक्तीकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात येते. तरीही शहरात काही जण नोकरी करून शिल्लक वेळेत रिक्षा चालवित असल्याच्या तक्रारी येत आहेत.
रिक्षा परवाना घेतल्यानंतर नोकरी मिळाल्यास त्या व्यक्तींनी त्यांचा रिक्षा परवाना स्वेच्छेने परत करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत रिक्षा परवाना परत करावा. त्यानंतर आरटीओकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.









