राज्यघटनेत दैवतांची चित्रे पुन्हा छापा, विरोध कोण करतो ते पाहू!

राज्यपालांचे रोखठोक वक्तव्य, विधानसभेत प्रस्ताव मांडण्याची सूचना, संघाच्या कामाचेही काैतुक, वाद होण्याची शक्यता?

नाशिक – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या मूळ प्रतीवर सुरूवातीला महापुरुषांचे फोटो होते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे संविधानातून काढून टाकलेले महापुरुषांचे फोटो पुन्हा छापण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नाशिक येथे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं दिला जाणारा कार्यक्षम आमदार हा पुरस्कार यावर्षी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे बोलत होते. ते म्हणाले की, संविधानाची पहिली प्रत नाशिकरोड येथील शासकीय मुद्रणालयात छापण्यात आली होती. त्याची प्रतही माझ्याकडे आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंग, महाराणा प्रताप, भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, प्रभू श्रीराम आणि नटराजांसारख्या देवांचे व महापुरुषांचे चित्र होते. राष्ट्राच्या स्वाभिमानाची ही चित्रे नंतर काढून टाकण्यात आली. आता आपण परत त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. आपण भारत मातेचे पुत्र म्हणून ही मागणी केली पाहिजे, मग बघू कोण विरोध करतं, असंही त्यांनी म्हटले आहे. त्यांची चित्रे समाविष्ट करून संविधानाची पुन्हा छपाई करावी, यासाठी विधीमंडळात तसा प्रस्ताव मांडावा, अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. तसेच सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची अखेरची भेट नाशिकलाच झाली होती. आपण अन्न व नागरी पुरवठामंत्री असताना कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता शिधापत्रिकांवर छापली होती. त्याची परवानगी घेण्यासाठी मी कुसुमाग्रजांकडे नाशिकला आलो होतो, असेही बागडे म्हणाले आहेत.

आम्ही संघात काम करायचो लोक आम्हाला हिणवायचे. काळ्या टोप्या घालणारे म्हणायचे. मोठा संघर्ष केला आणि आज आम्ही अच्छे दिन पाहतोय, असेही बसगडे म्हणाले आहेत. आता बागडे यांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.