हडपसर ते यवत महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे हटवण्यास सुरुवात

पीएमआरडीए कडून वेळापत्रक जाहीर, वर्षातून दोनवेळा होणार कारवाई, महामार्ग मोकळा श्वास घेणार

पुणे – पुणे शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेले अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे वेळापत्रक पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाकडून तयार करण्यात आले आहे. त्यानुसार आजपासून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे.

सर्व विभागांशी समन्वय साधून पुढील तीस दिवसांत ही कारवाई सुरू ठेवून महामार्ग मोकळे करण्यात येणार आहेत. महामार्गांवर वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांत पुढील ३० दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनधिकृत व अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे व इतर काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. वर्षातून दोनवेळा ही कारवाई केली जाणार आहे. आज हडपसर भागातील अतिक्रमणावर कारवाई सुरु करण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी यासंदर्भात महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ हा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे. या महामार्गाच्या हद्दीमध्ये ८ किमी ते २५२.३५० किमी म्हणजे हडपसर ते सोलापूर या दरम्यान लगतच्या मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. यापुढील काळात वर्षातून दोन वेळा अशा प्रकाराच्या कारवाईचे नियोजन आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेऊन बांधकामे करावीत, असे आवाहन डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.

अशी होणार कारवाई

३ ते १० मार्च

पुणे-सोलापूर महामार्ग (हडपसर ते यवत व उरुळी कांचन ते शिंदवणे)

पुणे-नाशिक महामार्ग (राजगुरुनगर),

चांदणी चौक ते पौड

१० ते २० मार्च

पुणे-सातारा महामार्ग

(नवले पूल ते सारोळे)

सूस मार्ग

हडपसर (शेवाळवाडी) ते दिवे घाट

नवलाख उंब्रे ते चाकण

हिंजवडी परिसर-माण

तळेगाव-चाकण-शिक्रापूर