दिलासा! ‘या’ तारखेपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

हवामान विभागाने दिली महत्वाची बातमी, पण पुढील काही दिवस धोक्याचे अनेक ठिकाणी यलो अलर्टचा इशारा

मुंबई – गेल्या महिन्यातील राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने रौद्ररुप धारण केलं आणि अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं. दरम्यान, ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील बहुतांश भागात २९ सप्टेंबर २०२५ पासून हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. राज्यात ७ ऑक्टोबर २०२५ पासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबर २०२५ पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या पंधरा संपूर्ण राज्यात धो धो पाऊस कोसळला होता.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, वाशिम, नाशिक, ठाणे,रायगडसह मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे लाखो हेक्टर पीक वाया गेले असून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दरम्यान हवामान विभागाने विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांसाठी आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची सक्रियता कायम राहणार आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ३ ऑक्टोबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.