
कोणत्या पदासाठी किती जागा? वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी, अशी होणार परिक्षा

मुंबई – महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पण कोणत्या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत. याबाबत स्पष्टता झाली नव्हती.

आता याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. यावेळी या भरतीमध्ये सन २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती होणार असून लवकरच त्याची जाहिरात प्रकाशित होण्याची शक्यता आहे. यात पोलीस शिपाई – १०९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २३,९३, कारागृह शिपाई – ५५४ एवढ्या जागांचा समावेश आहे. पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट-क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येत असून त्यासाठी ओएमआर (OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण आणि खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.









