
दिवाळीच्या तोंडावर सोने-चांदीचे भाव गगनाला भिडले, सोन्याबरोबर आता चांदीही महागली, जाणून घ्या आजचे दर

मुंबई – शभरात सोने आणि चांदीच्या दरातील वाढ दिवसेंदिवस सुरुच आहे. सप्टेंबर महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात १० हजारांपेक्षा अधिक रुपयांची वाढ झाली होती. तर ऑक्टोबर महिन्यात सोने आणि चांदीच्या दाराने मोठा उच्चांक गाठला आहे. सध्या दिवाळी आणि लगीनसराईच्या तोंडावर सोने प्रचंड महागले आहे.

फक्त एका वर्षात सोन्याच्या दरात ४६,४०८ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. चांदीनेही यात मोठी वाढ दाखवत प्रति किलो १ लाख ६७ हजार रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. सराफ बाजार उघडल्यानंतर अवघ्या काही तासांत चांदीच्या दरात सात हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमती दररोज रेकॉर्डवर रेकॉर्ड करत आहेत आणि अशा परिस्थितीत, आता सणासुदीच्या दिवसात किंमतही शिखरावर उसळल्या आहेत. देशांतर्गत सराफा बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नवीन उच्चांकी शिखरावर पोहोचल्या आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,२०,६२५ रुपयांवर पोहोचली तर, गेल्या एका वर्षात त्यात ५२ टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,२४,३१० आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,१३,९६० प्रति १० ग्रॅम इतका आहे. मुंबई, पुणे, चेन्नई आणि कोलकाता या तिन्ही महानगरांमध्ये २२ कॅरेट सोनं ₹१,१३,८१० आणि २४ कॅरेट सोनं ₹ १,२४,१६० प्रति १० ग्रॅम दराने विकलं जात आहे. महत्वाचे म्हणजे धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार, ज्वेलर्स आणि ग्राहकांकडून खरेदी वाढेल, त्यामुळे दर अजून काही प्रमाणात वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता, रशिया -युक्रेन युद्ध आणि जिओ पोलिटिकल यामुळे चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस सोन्या चांदीचे भाव वाढत असले तरीही खरेदी करणारे ग्राहक वाढतच असल्याची माहिती इतवारीच्या सराफा व्यापार्यांनी दिली आहे.
सोने-चांदीचा भाव वाढत असल्याने दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलावर्गामध्ये नाराजी दिसून आली. सोने, चांदीचे भाव एवढे वाढत असतील तर आम्ही खरेदी कशी करावी, असा प्रश्न या महिलांपुढे उभा राहिला आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता की भाव सोन्याचे आणि चांदीचे भाव एवढे वाढतील, असे मत सराफा बाजारातील एका महिला ग्राहकाने व्यक्त केले आहे.









