खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची, शिंदेचा पक्ष व्यक्तीकेंद्रीत

पुणे – पुण्यातील उद्धव ठाकरेंच्या गटातील ५ माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश करताच भाजपातील नाराजी उफाळून आली आहे. पक्षातील नाराजांनी चौकांमध्ये बॅनर झळकावत मनातील खदखद बाहेर काढण्याच प्रयत्न केला आहे. त्यामुळे पक्षातील असंतोष शांत करण्यासाठी हालचाली होत आहेत.

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे. यावेळी नगरसेवकांनी काँग्रेससोबतची युती न पटल्याचे सांगितले. तसेच त्यांना एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश का केला नाही, असा प्रश्न विचारला असता. व्यक्तीकेंद्रीत पक्ष की राष्ट्रकेंद्रीत पक्ष यात आम्ही भाजपची निवड केली असे सांगितले. भाजपचा नारा राष्ट्र प्रथम असा आहे, तसेच खरी शिवसेना ठाकरेंची असल्याचेही भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेविकांनी केला आहे. तर दुसरीकडे पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजप कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस विशाल दरेकर यांच्या माध्यमातून बॅनर झळकवण्यात आले. “दुश्मनी जमकर करो… दुश्मनी जमकर करो… लेकिन यह एहसास रहे, जब दोस्त बनजाये तो शरमिंदा ना हो…” असा मजकूर छापण्यात आला आहे. ज्यांचे पक्ष प्रवेश घडवून आणण्यात आले त्या माजी नगरसेवकांनी गेली पाच वर्ष केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्याचं काम केलं. आता राज्यामध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर केवळ आपली घरे वाचवण्यासाठी हे लोक पक्ष प्रवेश केला आहे. असा आरोप भाजपातील निष्ठावंतांनी केला आहे. दरम्यान यामुळे पुण्याच्या राजकारणात महानगरपालिकेच्या अनुषंगाने तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे महापालिकेत शिवसेनेचे दहा नगरसेवक होते. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, तेव्हा एका नगरसेवकाने एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला तर नऊ नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. मात्र आता यातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त चारच नगरसेवक राहिले आहेत.