‘ईव्हीएम’ विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे. तर दुसरीकडे तिकडे मनसेने सुद्धा या मुद्दावरून नाराज आहे.राज्यातील काही गावात, मतदान केंद्रावर मतदानात तफावत असल्याचा, मतदार आणि मतदानाची संख्या जुळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याविरोधात अर्जफाटे करण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याचा मार्ग चाचपण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे. ईव्हीएम या मतमोजणीच्या परीक्षेत पास होते की नापास हे लवकरच समोर येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी केली आहे. त्यांचा या मतदारसंघात निसटता पराभव झाला. त्यामुळे त्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. त्यासाठी ८.५ लाख रुपये त्यांनी निवडणूक विभागाकडे जमा केली आहेत. १८ मशीनची पुन्हा फेर मोजणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे राहुल मोटे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मोटे यांनी मागणी केली आहे.
परंडा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना झाला होता. या मतदारसंघात तानाजी सावंत यांनी १५०९ मताने निसटता विजय मिळवला. तानाजी सावंत यांना १ लाख तीन हजार २५४ तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोटे यांना १ लाख १ हजार ७४५ एवढे मतदान झाले. त्यानंतर मोटे यांनी फेत मतमोजणीसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. फेर मतमोजणी झाल्यानंतर काय चित्र राहणार याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.