रविंद्र चव्हाण यांची भाजप महाराष्‍ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड

रवींद्र चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन, महापालिका निवडणुकांचे आव्हान, पक्षविस्तारावर भर

मुंबई – महाराष्ट्र भाजपचे १२ वे प्रदेशाध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची मंगळवार, दि. १ जुलै रोजी बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे केंद्रीय निवडणूक अधिकारी किरेन रिजिजू यांनी भाजप महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात याबाबत घोषणा केली.

महराष्‍ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्‍हणून काम करत होते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून चव्हाण हे सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आषिश शेलार, विनोद तावडे यासह भाजपाचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्‍थित होते. विधानसभा निवडणूकीनंतर मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काहीसा नाराज असलेल्या चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी दिलेले प्रदेशाध्यक्षपदाचे आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोकण आणि इतर भागांत पक्षविस्तारावर भर देण्याचा निर्धार केला आहे. रविंद्र चव्हाण हे भाजपच्या युवा मोर्चातून राजकारणात आले असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा आमदार, भाजप प्रदेश सरचिटणीस, मंत्रीपद अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. डोंबिवली मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कारकिर्दीस सुरुवात करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. रविंद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला नवे नेतृत्व मिळाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांची निवड महत्वाची मानली जात आहे.

रविंद्र चव्हाण यांच्याकडे अगोदरपासूनच महाराष्ट्र भाजपाचे कार्यकारी अध्यक्षपद होते. त्यामुळे तेच या पदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे एकमत भाजपात झाले. ठरल्याप्रमाणे त्यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज न केल्यामुळे रवींद्र चव्हाण यांची आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.