राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा मनसेला सोडचिठ्ठी

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का, ठाकरेंच्या जवळ असूनही वाट्याला उपेक्षा, सोडचिठ्ठी नेमकी कशासाठी?

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती.आता प्रकाश महाजन यांनी मनसेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राणेंना दिलेल्या आव्हानानंतर त्यांना मुंबईत बोलावून समजूत काढण्यात आली होती. काही दिवसांपासून प्रकाश महाजन हे पक्षाच्या भूमिकेविषयी नाराज होते. याआधीच ते पक्षातून बाहेर पडण्याच्या विचारात होते, मात्र अखेर त्यांनी अधिकृतरीत्या मनसेला रामराम ठोकला आहे. पक्षाचे काही ठराविक कार्यक्रम आणि मेळाव्यांपासून प्रकाश महाजन यांना लांब ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आलं नव्हतं, म्हणून प्रकाश महाजन दुखावले गेले होते. ते पक्षाचे प्रवक्ते होते, तरी त्यांना काही वृत्त वाहिन्यांवर प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना आल्या होत्या. आपण आता थांबलं पाहिजे, ही भावना माझ्या मनात सारखी येत आहे. गंगेला बोल लावले तेव्हाच मी थांबले पाहिजे होते. मी पहलगामच्या वेळेसच थांबायला पाहिजे होते. पण मला वाटले की काहीतरी सुधारणा होईल. मला पद, तिकीटाची गरज नव्हती. हिंदूत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच आपेक्षा होती. कमीत कमी अपेक्षा ठेवून माझी उपेक्षा झाली. लोकसभेत मला विचारण्यात आले नाही. विधानसभेत जी जबाबदारी मला देण्यात आली, ती मी प्रामाणिकपणे पार पाडली, असे सांगत प्रकाश महाजन यांनी मनसेसोबतचा राजकीय प्रवास थांबवत असल्याचे म्हटले आहे.

महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानं आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जात आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. पण तोही प्रयत्न अपुरा पडला आहे.