राज ठाकरेंचा शिलेदार वरळीमधून विधानसभेच्या रिंगणात ? जोरदार चर्चा

लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचं देखील पाहायला मिळालं.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेतल्या. मात्र त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगलं. भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून अनेकदा शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला खोचक टोला लगावण्यात आला होता. त्यानंतर आता मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्यात आलं आहे.

मनसेनं वरळीच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवरून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना पाडा तसेच मनसे नेते संदीप देशपांडे यांना जिंकण्याचा निर्धार असा मजकूर या पोस्टरमध्ये आहे.

‘बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया! जनमनातला आमदार संदीप वरळीत आणूया! वरळीचे भावी आमदार (मनसे नेते) श्री संदीप देशपांडे’ असा मजकूर या पोस्टरवर आहे. या पोस्टरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरनंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीमधून निवडणूक लढणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.