
हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा, यामुळे पाऊस कोसळणारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती

मुंबई – राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये तीव्र पावसाची नोंद झाली आहे. आता हवामान विभागाकडून राज्यातील निम्म्या राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर. येथे विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. राज्यात ११ ते १५ ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तर तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होऊ शकते. महत्वाचे म्हणजे पुढील चार ते पाच दिवसांत कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर इतरही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.









