
हवामान विभागाकडून अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यात कधी पडणार पाऊस?, उकाड्यापासून सुटका

पुणे – गुडी पाडवा सणानिमित्त आज अनेक पुणेकर घरी आहेत. पण रोजच्या वाढत्या उकाड्याने त्रस्त ही झाले आहेत. पण पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात घट होऊन मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढलाय. विदर्भातील तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही चाळीसच्या आसपास तापमान गेले आहे. याच दरम्यान हवामान विभागाने उन्हाच्या तडाख्यापासून दिलासा देणारी बातमी दिली आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने ३१ मार्चला म्हणजे सोमवारी ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा घाट विभागात मंगळवारी पावसाची शक्यता आहे. तर बुधवारी अमरावती आणि यवतमाळ येथे विजांचा कडकडाट, मेघगर्जना, सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह गारा पडणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे. केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांवर आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाली आहे. चंद्रपूरमध्ये ४२ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पारा ४०च्या वर गेला आहे. पण येत्या 2 दिवसात तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होणार आहे.









