
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता थेट राजकारणात उमटताना दिसत आहेत. वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडले आहे.दरम्यान अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी कुठेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. ‘वैयक्तिक’कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…’ एवढीच त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.दरम्यान, अशोक खरातवर अत्यंत गंभीर आरोप आहेत. भोंदूगिरीच्या आडून त्याने महिलांचं लैंगिक शोषण चालवलं होतं. महिलांवर तो अत्याचार करायचा. त्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अशोक खरातला पाठीशी घातल्याचा रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप होत आहे. अशोक खरातसोबत त्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचेही दावा केला जात आहे.











