भाड्याने कुठे रहायला जायचं, या एवढ्याशी किरकोळ कारणावरून वाद झाले, पण त्यानंतर पतीने जे केलं त्यामुळे त्यांचा अख्खा संसार आणि आयुष्यही उद्ध्वस्त झाला. भांडणानंतर पतीने बायकोच्या डोक्यात खोरे घालून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सलमा गुराप्पा इकुरोट्टी, वय २८ असे मृत महिलेचे नाव असून गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी,वय ३० असे आरोपी पतीचे नाव आहे. सांगतलीतील विटा येथील पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांच्या सांगण्यांनुसार,सलमा आणि गुरापा हे दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते गेल्या काही काळापासून खानापूर नाक्याजवळ विजय उथळे यांच्या मालकीच्या खोलीत रहात होते. हे दांपत्य मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा.
गेल्या आठवड्यात त्यांच्यात पुन्हा वाद झाला. भाड्याची खोली बदलून कोठे राहायला जायचे, या कारणावरून जोरदार रात्री जोरात वादावादी सुरू होती. या भांडणामुळे संतापलेल्या गुराप्पाने रागाच्या भरात घरात असणाऱ्या लोखंडी खोऱ्याने पत्नी सलमाच्या डोक्यात वार केला. त्यात तिच्या डोक्याला जबर जखम झाली आणि तिचं खूप रक्त वाहून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाची तपासणी करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. यानंतर संशयित पती गुराप्पाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.