
मेट्रो-३ कधीपर्यंत सुरू होणार? समोर आली नवी तारीख, या संघटनेचा सरकारला इशारा

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू असून लवकरच पुणे शहराला एक नवा मेट्रो मार्ग मिळणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून येत्या काही दिवसांनी मेट्रोचा तिसरा मार्ग देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पुणे मेट्रोच्या मार्ग ३ वरील काम पुन्हा एकदा अंतिम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुणे मेट्रो मार्ग- ३ हा आयटी हब हिंजवडी आणि शिवाजीनगर या मार्गावर आहे. त्यामुळे हा मार्ग आयटीवाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा मार्ग २३.३३ किमी लांबीचा असून, सध्या ८५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. सुरूवातीला हा प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता अंतिम मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. वारंवार होणाऱ्या विलंबामुळे आयटी असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. जर वेळेत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही, तर अनेक आयटी व्यावसायिक पुण्याबाहेर स्थलांतर करण्याचा विचार करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. आता हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पुण्यात ४२ किमी लांबीची मेट्रो लाईन प्रस्तावित आहे, हा मार्ग निगडी-मुकई चौक-वाकड-नाशिक फाटा-चाकण या मार्गावरून जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रस्ताव लवकरच राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
पुण्यात मेट्रोचे जाळे आणखी घट्ट करण्यास राज्यस्थरावर अनेक हालचाली होत आहे. नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशत पुणे मेट्रोच्या अनेक नव्या मार्गांची घोषणा करण्यात आली. तसेच या कामासाठी भरीव निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. पण आधी घोषणा केलेले मार्ग अजूनही सुरु झालेले नाहीत.









