प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या स्विकारणार पदभार

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार, प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया क कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यासर्व प्रदेश कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. पदग्रहण सोहळ्याची तयारी झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे.

नाना पटोले यांनी चार वर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.