“ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवा”, अजित पवारांनी दिले विरोधकांना ओपन चॅलेंज

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र या निकालानंतर अनेकांकडून ईव्हीएम मशीनबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यापार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषणाची भूमिका घेतली.महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबरपासून पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे डॉ. बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत.

त्यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेमंडळींकडून देखील घेतली जात आहे. त्यानंतर अजित पवार यांनी आज स्वतः त्या ठिकाणी जाऊन आंदोलनाला भेट दिली.आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेतली. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. ईव्हीएम घोटाळा झाल्याचं सिद्ध करुन दाखवण्याचं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिले आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले, आपलं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यानुसार बाबा आंदोलन करत आहेत. बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यातील काही गोष्टी निवडणूक आयोग, कोर्ट यांच्याशी संबंधित आहेत.लोकसभा निवडणूक झाली तेव्हा मावीआच्या ३१ जागा आल्या. आमच्या १७ जागा आल्या. त्यावेळी कोणी काही म्हणाले नाही. बारामतीत माझ्या उमेदवार पराभूत झाल्या. जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे असे अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विधानसभेत बारामतीची लोकं मला आणि लोकसभेला शरद पवार यांना मतदान करत होते. पवार साहेबांना ८६ हजाराचं मताधिक्य मिळालं. मला ५० हजाराचं मिळालं. काही लोकांनी मला मतदान केलं नाही. लोकांचा कौल बदलला. काही पराभूत उमेदवार म्हणतात ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला. मी म्हटलं तुम्ही सिद्ध करून दाखवा.