मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा, या महिन्यात होणार घोषणा, नागरिकांना सुलभ परिवहन सेवा

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे. मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार आहे.

आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.